निरामय योगा संस्थेच्या जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेला प्रतिसाद
रत्नागिरी : रथसप्तमीनिमित्त दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी, निरामय योग संस्था, रत्नागिरी पुरस्कृत जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध संस्थांच्या 50 पेक्षा जास्त योगसाधकांनी सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यामध्ये 26 साधकांनी प्रत्येकी 300 नमस्कार, 24 साधकांनी प्रत्येकी 350 नमस्कार, 22 साधकांनी प्रत्येकी 400 नमस्कार तर 18 साधकांनी प्रत्येकी 501 नमस्कार घालून सलग 2 तास 05 मिनिटात 17 हजार पेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.
सर्व विजेते साधकांना उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. निलेश माईनकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री. उपेंद्र सुर्वे , श्री.गणेश धुरी, श्री.सचिन पोकळे,श्री. अमृतलाल (रमेशभाई) पटेल आणि सौ प्रियांका मुळे यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा खूपच चुरुशिची झाल्याने पंचांना निर्णय देणे खूपच कठीण काम झाले होते. सगळेच साधक एकापेक्षा एक सरस कामगिरी करत होते. सलग 501 नमस्कार घालूनही कोणीही साधक थांबायला तयार नव्हते. शेवटी वेळेचे बंधन लक्षात घेता 501 नमस्कारानंतर स्पर्धा थांबविण्याचा निर्णय आयोजक आणि पंच यांना घ्यावा लागला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ रिशिता गावकर, द्वितीय क्रमांक डॉ. अजिंक्य गांगण, तृतीय क्रमांक कु.ओमकार देवरुखकर महेश शेवडे, रिया कामतेकर, सुशांत विचारे, शरद नागवेकर, विनोद देवरुखकर, तुषार सावंत, अनिता तिवारी, श्रद्धा दळवी, सुरेखा संसारे, अमृता लोध, साकेत सावंत, रितेश शिंदे, ऋतुराज पिलणकर, रामचंद्र वारगावकर आणि प्रमोद खेडेकर या सर्व साधकांना सलग ५०१ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केल्याने सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
निरामयचे साधक श्री. राकेश चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानले. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता, भविष्यात योगप्रेमिंसाठी अशाच विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन निरामय योग संस्थेमार्फत केले जाईल, अशी ग्वाही पतंजलिचे आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त योगगुरू व निरामय योगकक्षेचे सर्वेसर्वा श्री. विरू स्वामी सर यांनी यावेळी दिली.