- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत
मुंबई, 22 मार्च 2024 : गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते या दांपत्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. श्री.बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, आ.बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे,भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. कोडवते पती पत्नीच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीसाठी मदत होईल असा विश्वास श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी श्री.बावनकुळे म्हणाले की,डॉ.कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची निरपेक्षपणे सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉ.कोडवते दाम्पत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. डॉ.कोडवते दांपत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या विकासाने प्रेरित होऊन भाजपामध्ये आलेल्या कोडवते पती पत्नीच्या नेतृत्वाला योग्य संधी, सन्मान दिला जाईल अशी ग्वाही श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिली.
