नाणीज : येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू धावजेश्वर देवाचा शिमगोत्सव उद्या शुक्रवार दि. २२ पासून सुरू होत आहे. यानिमित्त पालखी, होळी, गाऱ्हाणे असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
नाणीज येथे पारंपरिक पद्धतीने गावातील सर्व लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. दुपारी एक वाजता पालखीला रुपये लावण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता ग्रामदेवतेची पालखी सहाणेवर विराजमान होईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सर्व प्रमुख मानकरी, गावकरी होळी तोडण्यासाठी जाणार आहेत. गावकरी आबालवृद्धांसह देवाचा नाम घोष करत पारंपारिक पद्धतीने होळी खेळवत रात्री आठ वाजता मंदिराच्या प्रांगणात येईल. त्यानंतर रात्री १० वाजता होळी उभी राहाणार आहे. होळी उभी राहिल्यावर प्रमुख मानकरी देवाला गाऱ्हाणे घालतात. होळीभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालतात.
ग्रामदेवतेच्या प्रांगणात ढोल-ताशाच्या तालावर पालखी नाचवताना, खेळवताना पाहणे खरोखरच आनंदाची पर्वणी असते. या उत्सवाचा केंद्रबिंदू असतो तो दिपोत्सव! रात्री आकरा वाजता गावातील माहेरवाशिणी व सासरवाशिणी, सर्व भगिनी एकत्रितपणे येऊन दिवे लावतात. दिवे मंदिराच्या भोवती प्रज्वलित करतात शेकडो दिवे एकत्रितपणे तेवताना पाहणेही नेत्रदिपक असते. नाणीजमधील सर्व वाड्या-वस्त्यांवर चाकरमानी, ग्रामदेवताचा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ मार्च पौर्णिमेला होम होणार होणार आहे.
