संगमेश्वर दि. १ : संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी अब्दुल करीम उपाध्ये यांचा मुलगा अफराज याने फादर एंजल स्कूल वाशी या इंग्रजी माध्यम शाळेतून दहावीच्या परीक्षेत ९४% गुण प्राप्त करून उज्वल यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल कसबा परिसरातून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
अब्दुल करीम उपाध्ये यांचे शालेय शिक्षण कसबा येथील मराठी शाळेत आणि माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कसबा येथे झाले. शाळेत असताना अब्दुल करीम हे हुशार होते. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि तेथेच ते उच्च पदावर नोकरीला लागले. नोकरीत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, सामाजिक कार्यात हातभार लावणे यासाठी अब्दुल करीम हे नेहमीच अग्रेसर असतात.
अफराज मध्ये आपल्या वडिलांचे गुण उतरले असून इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असताना कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने वडील अब्दुल करीम आणि आई मिनाझ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत, अभ्यासात सातत्य ठेवत दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४% गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे अफराजने गणितात १०० पैकी ९७ गुण प्राप्त केले आहेत अफराजच्या या यशाबद्दल त्याचे मित्रमंडळी नातेवाईक, परिसरातील स्नेही आणि कसबा गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दहावीनंतर विज्ञानाचे शिक्षण घेत वरिष्ठ अधिकारी बनण्याचे अफराज याचे स्वप्न आहे .
