देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेजला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात ‘फाईन आर्ट’चे सर्वसाधारण विजेतेपद
सुयोग, अक्षय आणि सिद्धी या यशाचे शिलेदार
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला ‘मुंबई विद्यापीठ ५६व्या आंतरमहाविद्यालय युवा महोत्सव: २०२३-२४’ मधील ‘फाईन आर्ट’चे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाल्याचे डॉ. सुनील पाटील (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ) यांनी पत्राद्वारे कळविले आहे. महाविद्यालयाला हा सन्मान प्रथमच प्राप्त झाल्याने, महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४ मध्ये महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत ४ सुवर्ण व २ रौप्य पदके प्राप्त करून हा सन्मान प्राप्त केला आहे. या पदक प्राप्त शिलेदारांमध्ये सुयोग चंद्रकांत रहाटे याने २ सुवर्णपदके (कार्टून आणि कोलाज) व १ रौप्यपदक क्ले मॉडेलिंगमध्ये प्राप्त केले, तर अक्षय शिवाजी वहाळकर याने १ सुवर्णपदक पोस्टर मेकिंगमध्ये आणि १ रौप्यपदक रांगोळी कला प्रकारात मिळवले आणि सिद्धी लवू शिंदे हि १ सुवर्णपदक मेहंदी या कला प्रकारात मिळविण्यात यशस्वी झाली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या विशेष समारंभात विद्यापीठाची विविध कला प्रकारातील सर्वसाधारण विजेतीपदे, तसेच इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव आणि राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील वैयक्तिक व सांघिक विजेत्या कलाकारांचा सन्मान या समारंभात होणार आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मुंबई विद्यापीठाचे फाईन आर्टचे मार्गदर्शक विलास रहाटे यांचाही सन्मान याप्रसंगी केला जाणार आहे. या समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक ३० जुलै, २०२४ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता कॉन्व्होकेशन हॉल, मुंबई विद्यापीठ, फोर्ट-मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या समारंभाला प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी(मा. कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) अध्यक्षस्थानी, तर प्राचार्य डॉ. अजय भामरे(मा. प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाविद्यालयाला फाईन आर्ट प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देणाऱ्या विद्यार्थी व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे आणि विभागातील सदस्य, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, कार्यालयीन अधीक्षिका मीता भागवत आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.