Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भल्या पहाटे सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा खेडच्या दिशेने धावली!

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणारी 22115 या साप्ताहिक वातानुकूलित एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली आणि गाडी रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक आल्यावर पुढे सरकेनाशी झाली. अपेक्षित वेळेत जवळच्या स्थानकावरून पास न झाल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी स्थानकावर गुरुवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास तब्बल पाच वेळा आपत्कालीन सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा अलर्ट झाली. मात्र, थोड्या वेळाने थांबलेली गाडी गोव्याच्या दिशेने येण्यास निघाल्याने यंत्रणेने नि: श्वास सोडला.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोव्यात करमाळीला जाणारी (22115) ही वातानुकूलित एक्सप्रेस गाडी गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक असता इंजिनमधील प्रेशर मेंटेन न झाल्यामुळे गाडी पुढे सरकेनाशी झाली. पुढच्या स्थानकावर तिचा संपर्कही होऊ शकला नाही. अखेर ती ज्या स्थानकावर येणे अपेक्षित होते. न आल्यामुळे बेलापूर येथील कंट्रोल रूमसह रत्नागिरी स्थानकाशी संपर्क करण्यात आला. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी स्थानकावर भल्या पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास पाच वेळा आपत्कालीन सायरन वाजला आणि रत्नागिरी स्थानक परिसरात अशा प्रसंगी नेहमी ‘अलर्ट मोड’वर असणारी आपत्कालीन व्हॅन तातडीने खेड -नातूवाडी बोगद्याच्या दिशेने रवाना झाली. आपत्कालीन व्हॅन भोके स्थानकामध्ये पोचली असेल नसेल तोपर्यंत गोव्याच्या दिशेने येणारी आणि विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान नातूवाडी बोगद्याजवळ थांबलेली एलटीटी करमाळी एक्सप्रेस (22115) इंजिनमधील तांत्रिक दोष दूर होऊन मार्गस्थ देखील झाली होती. उपलब्ध माहितीनुसार इंजिनमध्ये प्रेशरची समस्या उद्भवल्यामुळे काहीवेळ गाडी थांबली होती. मात्र, प्रेशर मेंटेन झाल्यानंतर ही गाडी मार्गस्थ देखील झाली. मात्र, पहाटेच्या सुमारास अचानक पाच वेळा अचानक सायरन वाजल्यामुळे रत्नागिरी स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. रेल्वेची आपत्कालीन यंत्रणादेखील तिला मिळालेल्या संदेशानुसार घटनास्थळाकडे जाण्यासाठी रवाना झाली होती. मात्र, काही वेळाने सर्व काही ठीकठाक असल्याचे लक्षात येताच यंत्रणेने सुस्कारा सोडला.

दरम्यान, सायरन वाजताच रत्नागिरी स्थानकावर तैनात असलेली आपत्कालीन व्हॅन अवघ्या काही मिनिटात घटनास्थळाकडे जाण्यासाठी रवाना झाल्यामुळे अशा प्रसंगी रेल्वेची यंत्रणा सदैव अलर्ट मोडवर असल्याचे प्रत्यंतर आले. आधी पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेली समस्या त्या पाठोपाठ दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक अशा घटनांचा विचार करता कोकण रेल्वेची यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 24 तास तत्पर असल्याचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास उद्भवलेल्या प्रसंगामुळे निदर्शनास आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE