सरंद येथे भूमिरक्षक संघातर्फे शेतकऱ्यांना भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक
सरंद : संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथे सावर्डे येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या भूमीरक्षक संघातर्फे ग्रामीण कृषी जागरूकता कर्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे मनुष्यचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या वेळी संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती अमृता साबळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडल कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे, सरंद गावच्या सरपंच सौ. सोनाली जाधव तसेच उपसरपंच उमेश पवार, गावचे तलाठी, इतर कृषी अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
सरंद गावातील प्रगतशील शेतकरी संतोष गोटेकर यांनी या भात लावणी यंत्राची खरेदी केली असून, गावातील शेतकरी शंतनू बापट यांच्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सध्या शेतीच्या कामांसाठी असणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त भात लागवड या यंत्राद्वारे केली जाते. या बाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले.
शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढवावा असे संघाद्वारे आवाहन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी भूमीरक्षक संघाचे विद्यार्थी प्रसाद जाधव, सार्थक देवतर्शे, किरण उदमल्ले, मिथिल कोळपे, निरंजन शिंदे, चिन्मय शेलार, हर्षवर्धन शिंदे, आदेश विघे संकेत फडतरे,आशुतोष घुगरे,श्रेयस शिंदे, सुशांत पाटील, विशाख एस आदी उपस्थित होते.