मडगाव ते बांद्रा द्वि-साप्ताहिक गाडीचा प्रस्ताव बोर्डाकडे मंजुरीसाठी
रत्नागिरी : मडगाव ते बांद्रा टर्मिनस अशी आठवड्यातून दोनदा धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. या कायमस्वरूपी गाडीचा प्रस्ताव दिनांक २१ ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव ते बांद्रा टर्मिनस या मार्गावर धावणार आहे.
बांद्रा टर्मिनस ते मडगाव मार्गावरील गाडी बुधवार तसेच शुक्रवारी धावणार आहे.
आठवड्यातून दोनदा धावणारी ही गाडी मडगाव येथून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून रात्री अकरा वाजून 40 मिनिटांनी ती पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनसला पोहोचेल. तर बांद्रा टर्मिनस येथून ही गाडी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटून रात्री दहा वाजता ती गोव्यात मडगावला पोहोचेल, असे नियोजन करून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पश्चिम उपनगरातून कोकण रेल्वे मार्गावर नवी गाडी सुरू होणार असल्याचे वृत्त ‘डीजी कोकण’ने दिले होते, या वृत्ताला आता रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाने पुष्टी मिळाली आहे.
कोकणवासियांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होणार!
मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकणात येणारी कायमस्वरूपी गाडी नसल्यामुळे कोकणवासियांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सध्या आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी चालवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. बांद्रा टर्मिनस येथून सुटल्यानंतर ही गाडी वसई रोड, भिवंडी रोड पनवेल, रोहा, मार्गे मडगावला जाईल. रेल्वे बोर्डाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गाडीचे थांबे जाहीर केले जातील. एकोणवीस डब्यांची ही एलएचपी प्रकारातील गाडी चालवण्याचे रेल्वेकडून नियोजन करण्यात आले आहे.
