देवरूख : नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांमधे असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, वर्तन जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येतो. हा उपक्रम जि. प. डिंगणी गुरववाडी या शाळेत राबविण्यात आला.
यात सूर्यनमस्कार व इतर वेगवेगळ्या योगासनांची प्रात्यक्षिके शिकवली जातात. तसेच वेगवेगळे खेळसुद्धा खेळले जातात. त्यामुळे सुदृढ आरोग्य घडविण्यास मदत होते.
गणिती किंवा व्यवहारज्ञान वाढवणारी कोडी सोडवण्याचा उपक्रम सुद्धा यामध्ये घेण्यात आला. ज्यामध्ये वर्गामधील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला डोके चालवून वेगळे उत्तर देण्यास संधी मिळावी हा एक निव्वळ हेतू. कोडी सोडवण्याचा उपक्रम घेतल्यामुळे वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना उत्तर देण्याची संधी मिळाली, भले ते उत्तर चुकीचे असो. वेगळा विचार करण्याची संधी (Creativity) सहसा वर्गामध्ये अबोल राहणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळावी हा यामागील हेतू असतो .
