देखभाल इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक दोन तास विस्कळीत

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजला ; वंदे भारत एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांना फटका

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी ऐन सकाळच्या वेळेत रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली. यामुळे गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस एक्सप्रेससह जनशताब्दी एक्सप्रेसला देखील फटका बसला. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सी एम एस मशीन अचानक बंद पडल्यामुळे या भागातून याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह जनशताब्दी एक्सप्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली -एलटीटी गरीब रथ एक्सप्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या.

या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजल्याने अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी 24 तास सतर्क असलेली कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE