सुरक्षा बाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांचे आवाहन
रत्नागिरी : 265 चिपळूण विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानानंतर युनायटेड हायस्कूलमधील स्ट्राँगरुम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्टाँगरुमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे ईव्हीएम अथवा स्टाँगरुमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.
काल संध्याकाळी एका हॉटेलजवळ एका वॅगनर वाहनात चार व्यक्ती असल्याची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यांने केली होती. या तक्रारीत त्या व्यक्ती छेडछाड अथवा जादूटोणा करण्याविषयी थांबले असल्याचे त्यांनी सांगितले होते. या तक्रारीनुसार पोलीसांनी त्या व्यक्तींना चौकशीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यांची सविस्तर चौकशी करुन जबाब नोंदविला. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळलेली नाही. ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या चार व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आलेला होता. पोलीसांच्या सविस्तर चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलेले आहे.
स्ट्राँगरुमपासून दीडशे मीटर बाजूला मुंबई – गोवा हायवे आहे. दोनशे मीटरवर गुहागर – विजापूर हायवे आहे. या दोन्ही हायवे भागातील शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. स्ट्राँगरुमला दिलेली त्रिस्तरीय सुरक्षा कवच अभेद्य असल्याने ईव्हीएम तसेच स्ट्राँगरुमविषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.
