इंधनाच्या खर्चात झाली वर्षाला १९० करोडची बचत : अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण गेल्या वर्षी पूर्ण झाल्याने कोकण रेल्वे ही देशात १०० टके ग्रीन रेल्वे झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोकण रेल्वे महामंडळ हे केवळ रेल्वे गाड्या चालवत नाही तर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, भुयारी मार्ग, पुलांची उभारणी, मालवाहतूक अशा क्षेत्रात देशभरातील 16 ते 17 राज्यांमध्ये काम करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा रेल्वे पूल उभारून कोकण रेल्वेच्या अभियंत्यांनी आपले अभियांत्रिकी कौशल्य जगाला दाखवून दिले आहे, असे श्री. झा म्हणाले.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण म्हणजे 740 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गेल्यावर्षी पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणामुळे डिझेलच्या तुलनेमध्ये दर वर्षाला जवळपास १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याचे ते म्हणाले.
प्रवासी सुविधांमध्ये कोकण रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी विभागामध्ये खेड तसेच चिपळूण येथे सर्व कॅटेगिरीतील प्रवाशांसाठी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज ही सुविधा पुरवली आहे. पुढील प्रत्येक वर्षी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर वर्षी सात ते आठ एक्झिक्युटिव्ह लाऊंज निर्माण केले जाणार आहेत.यावेळी मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता आर नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.