ना. नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे.

भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत आज श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सह-संघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस माधवी नाईक, सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस विजय चौधरी तसेच राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी राज्यातील भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपाचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेल्या ना. नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे असलेले अतिक्रमण अवघ्या १५ दिवसात हटवले. त्यांनी केलेली ही धडक कारवाई अद्यापही चर्चेत असतानाच आता पक्षाने या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या विचारांचे मतदार आहेत. अशावेळी रत्नागिरीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ना. नितेश राणे यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व आवश्यक असल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने ही रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी ना. नितेश राणे यांच्याकडे सोपवली असून जिल्हा भाजपकडून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE