मुंबई : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांच्या व बंदरांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्या संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी,मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे,एमएफडीसीच्या कार्यकारी संचालक अनिता मेश्राम, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त युवराज चौगुले, उपायुक्त ऋता दीक्षित, उप सचिव किशोर जकाते आदी उपस्थित होते.
शासनाने मच्छिमारांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे बांधकाम, लाटरोधक भिंती, नौकानयन मार्गातील गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही कामे गतीने पूर्ण व्हावीत. मच्छिमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या निधी विहित वेळेत खर्च करण्यात यावा. अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
