रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काढलेल्या ग्रंथ दिंडीमध्ये येथील फाटक हायस्कूल रत्नागिरीचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले.
दि. २७ फेब्रुवारी या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या दिवशी रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला होता. परंतु या दिंडीचे खास आकर्षण होते फाटक हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचे वाद्यांसह असलेले लेझीम पथक. या लेझीम पथकामध्ये इयत्ता आठवीच्या १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना मंदार सावंत आणि बेबीताई पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. ही दिंडी जेलनाका ते स्वा. सावरकर नाट्यगृह या मार्गाने गेली. या शिस्तबद्ध लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचे दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा सुमिता भावे, सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापक श्राजन कीर यांनी अभिनंदन केले.
