Good News | होळीसाठी दादर-रत्नागिरी अनारक्षित विशेष ट्रेन
रत्नागिरी : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला असतानाच मध्य रेल्वेने या मार्गावर होळीसाठी दि. ११ मार्च २०२५ पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित धावणार आहे.
दादर – रत्नागिरी मार्गावर रेल्वेने विशेष गाडी जाहीर केली असली तरी जुनी गाडी पूर्ववत करण्याच्या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. रेल कामगार सेनेने ही गाडी दादर येथून कशी सोडता येईल हे अभ्यासपूर्वक पटवून दिले आहे. आम्ही ही गाडी पूर्ववत करायला मध्य रेल्वेला भाग पाडू.
–श्री. विनायक राऊत, माजी खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.
रेल्वेची ही हातचलाखी मान्य नाही. दादर- रत्नागिरी नियमित गाडीचा बळी देऊन केवळ तीन फेऱ्यांची एक्सप्रेस नको. हे थांबे तर तुतारीला आहेत. आम्हाला पॅसेंजर हवी. आंदोलनाची हवा काढण्याच्या प्रयत्नाला शिवसेनेने बळी पडू नये. एकतर जुनी गाडी पूर्ववत करून घ्यावी किंवा नवी गाडी कायमस्वरुपी करावी.
–अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.
डब्यांची रचना : एकूण डबे 16
सर्वसाधारण श्रेणी : 14 डबे
एसएलआर2 डबे
विशेष गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.