रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली.
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली ते आडवली स्थानकाच्या दरम्यान मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. यामुळे मुंबईकडे जाणारी जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेससह अन्य काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
या दुर्घटनेनंतर कोकण रेल्वेचे आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड रुळावरून बाजूला केल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली.
