दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • तेजस, जनशताब्दी एक्सप्रेससह सहा एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवल्या
  • वाहतूक पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

    रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विलवडे तसेच वेरवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वा.च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेससह जवळपास सहा एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसला या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची आपत्कालीन टीम घटनास्थळी रवाना झाली. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    मंगळवारी दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच कोकण रेल्वे मार्गावर विलवडे ते वेरवली दरम्यान मांडवकरवाडी येथील रेल्वे बोगद्यासमोर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक थांबवावी लागली. मडगांव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त भागातून निघून गेल्यानंतर दरड कोसळली. सायंकाळी पावणेसहा वा.च्या सुमारास दरड कोसळल्याचे लक्षात येताच या मार्गावरून धावणार्‍या गाड्या त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या. थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगांव-मुंबई तेजस एक्स्प्रेस, एर्नाकुलम पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, मडगांव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस, मडगांव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या खारेपाटण ते मडगांव दरम्यान विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या. मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस मात्र घटनास्थळावरून वेळीच निघून गेल्याने तिला या दुर्घटनेचा फटका बसला नाही.

    Digi Kokan
    Author: Digi Kokan

    Leave a Comment

    READ MORE