जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दापोली सायकलिंग क्लबचा उपक्रम
दापोली : जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ अविचारी वापर आणि वाढते प्रदुषण यामुळे मानवाचे भविष्य अंधारमय होते आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी २४ मार्च २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली – डॉ आंबेडकर चौक – एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक – गिम्हवणे – कृषि विद्या विभाग, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ – आझाद मैदान असा ७ किमीचा होता. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कृषि विद्या विभाग येथे विभाग प्रमुख डॉ प्रशांत बोडके, डॉ वैभव राजेमहाडिक, डॉ विजय मोरे, डॉ शितल यादव, डॉ सानिका जोशी, आणि सहकारी यांनी वसुंधरेचे महत्व, सेंद्रिय शेती संशोधन केंद्रातील प्रकल्प, संशोधन, भूसुधारक जिवाणू निर्मिती अर्क, इस्त्रायल बायोगॅस युनिट, जीवामृत, नाडेप कंपोस्ट खत, गांडूळ खत, मधुमक्षिका पालन युनिट, कृषि हवामान वेधशाळा इत्यादींबद्दल माहिती दिली. कृषि हवामान वेधशाळेतील मृद तापमापक, वायुवेग मापक, सूर्यप्रकाश तास मापक, एकेरी दुहेरी स्टिव्हन्सन स्क्रीन, वायुदिशा दर्शक मापक, खुले बाष्पीभवनमापक पात्र, स्वयंचलित पर्जन्य मापक, दवबिंदू मापक इत्यादी उपकरणे अनेकांनी पहिल्यांदाच पाहिली. पर्यावरण वातावरण संबंधित शंकांचे निरसन झाले, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तसेच प्रत्येकाला भेट म्हणून तुरीच्या बिया पण कृषि विद्या विभागातर्फे देण्यात आल्या. तसेच पुस्तक दिवस असल्याने अथर्व प्रशांत निजसुरे यांच्यातर्फे त्यांनी स्वतः काढलेल्या चित्रांचे बुकमार्क सर्वांना देण्यात आले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, विनय गोलांबडे, पराग केळसकर, रोहन कदम, मृणाल खानविलकर, संदेश चव्हाण, अमोद बुटाला, संदिप मांजरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.