अलिबाग, (जिमाका): शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व श्रीसिद्धिविनायक मंडळाच्या वतीने नागाव, चौल, रेवदंडा, साळाव- मुरुड या ठिकाणी शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा “निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान” या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विकासाच्या योजना, सुधारित बीज भांडवल योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांसह, ध्वजदिन निधी संकलन, सैनिकांप्रती आदर, अशा विविध विषयांवर जनप्रबोधन केले.
या कलापथकाचे नेतृत्व शीतल म्हात्रे करीत असून कलाकार म्हणून तुषान मढवी, श्रावणी राऊत, नेहा पाटील, सानवी म्हात्रे, मृदुला म्हात्रे, नेहा म्हात्रे आदी कलाकार सहभागी झाले आहेत. या पथनाट्याच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील तब्बल 100 ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असल्याचे शीतल म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरु झालेल्या या लोकजागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

