अलिबाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण योजनेंतर्गत दि.8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई, वाशी येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विक्री प्रदर्शनात देशभरातून ५७० स्वयंसहायता समूहाने सहभाग घेतला. तसेच या प्रदर्शनात 70 खाद्यपदार्थांचे स्टॉल ग्राहकांच्या सेवेसाठी ठेवण्यात आले होते. रायगडमधील ऋचा समोर या प्रदर्शनात सर्वाधिक विक्री करण्याचा मान मिळवला.


ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहाने बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री दि.8 मार्च ते दि.21 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आली. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातून 10 समूहांनी सहभाग घेतला होता.
या प्रदर्शनामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील समूहाने सर्वाधिक विक्री केल्याबद्दल उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी व राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री.सिद्धेश चंद्रकांत राऊळ यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.
महालक्ष्मी सरस 2023 मध्ये जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा व्यवस्थापक,विपणन रायगड श्री. सिद्धेश चंद्रकांत राऊळ यांनी काम केले. या प्रशिक्षणास रायगड जिल्ह्यातील समूहांना सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्रकल्प संचालक डॉ.सत्यजित बडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.















