देवरुख
: निसर्गाची खरी ओळख व्हावी
, त्याचे माणसाच्या जीवनातील अनन्यसाधारण असणारे महत्व नव्या पिढीला कळावे
, विद्यार्थी स्वावलंबी व्हावेत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय करता येवू शकते
, अशा विविध उद्देशाने मातृमंदिर देवरुख आयोजित ऋतुसंवाद शिबिराचे चौथे उन्हाळी शिबीर सोमवारपासून सुरु झाले. शेजारच्या ५
जिल्ह्यांमधून आलेल्या उत्साही ४२ विद्यार्थ्यांच्या सहभागाने या धम्माल शिबिराला सुरुवात झाली
.
मातृमंदिरच्या विस्तीर्ण अशा २४ एकरच्या फार्मवर , आंब्याच्या बागेत उभारलेल्या कलात्मक स्टेज आणि परिसरात या शिबिराचे उदघाटन झाले. मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, उपाध्यक्ष विलास कोळपे, सेक्रेटरी विनय पानवलकर, सामाजिक कार्यकर्ते यु्युत्सु आर्ते व पालक प्रतिनिधी मनीषा शिंदे यांनी या
प्रसंगी व्यासपीठावरून शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.

मातृमंदिरच्या सर्व कार्यक्रमांची खासियत म्हणजे अनोख्या उदघाटन कल्पना.
हे उदघाटन देखील अशाच वेगळ्या प्रकारे झाले. दुर्गा भागवत यांच्या 'ऋतुचक्र' या पुस्तकाच्या रूपाने पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा वारसा
ज्येष्ठाकडून सर्वात लहान सहभागी पर्यंत पोहोचला.
पुढील ४ दिवसात मातीकाम, देवराई अभ्यासभेट, आकाशदर्शन, बांबू क्राफ्ट, साहसी खेळ, ओरिगामी, वैज्ञानिक खेळणी, नुक्कड नाटक, फार्म व्हिजिट, श्रमदान, अनोखे खेळ व गाणी इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून व तज्ञ् मार्गदर्शकांच्या सहवासात शिबिरार्थी भवताल वाचण्याचा व अनुभवण्याचा प्रयत्न करतील.
या शिबिरात अश्विनी, सुमित, दीपाली, अभिलाषा, प्रियांका, सौरभ, ऐश्वर्या व समृद्धी हे कार्यकर्ते ४ दिवस विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रम करून घेणार आहेत.
