सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय : केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई, दि. ११ मे २०२३ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय आहे असे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे यांनी गुरुवारी व्यक्त केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, गणेश हाके आदी यावेळी उपस्थित होते.

 

श्री. राणे म्हणाले की , सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आमचेच सरकार पुन्हा येणार अशी भविष्यवाणी करणा-यांना चांगलीच चपराक बसली आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. उद्धव ठाकरे व त्यांचे काही सहकारी नैतिकतेची भाषा करत शहाजोगपणे सल्ले देत आहेत .मात्र २०१९ च्या निकालानंतर भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळाले असताना केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या लालसेपायी ठाकरे यांनी हिंदुत्व व नैतिकतेला सोडचिठ्ठी देत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. भाजपाचा विश्वासघात करणाऱ्यांना नैतिकतेचे सल्ले देण्याचा अधिकारच नाही अशा शब्दात श्री. राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले. 

 

न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये पाहिली तर संविधानाचे मुलभूत ज्ञान देखील श्री. ठाकरे यांना नाही हेच दिसले. आगामी  लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः च्या ताकदीवर एकतरी खासदार निवडून आणावा असे आव्हान श्री. राणे यांनी दिले. 

श्री. राणे यांनी यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. शिंदे-भाजपा सरकार हे यापुढील काळात राज्याला आणखी प्रगतीपथावर नेईल, असा विश्वासही श्री. राणे यांनी व्यक्त केला.

  

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE