ट्रकची दोन गाड्यांना धडक ; तिन्ही वाहनांचे नुकसान
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली. ही घटना बुधवारी (५ जुलै 2023) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.मात्र, तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच नाणीजधाम रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा वाहतूक पोलिस घटणास्थळी दाखल झाले. मुंबईहून गोव्याच्या दिशेने ट्रकचालक नंदकिशोर रोहिदास (५०, राहणार फोंडा – गोवा ) हा आपल्या ताब्यातील ट्रक ( क्र. AJ 14 GH 5321) घेऊन जात होता. बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हातखंबा हायस्कूलजवळ अवघड वळणावर येताच गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून धडक देत समोरुन येणाऱ्या एसटी ( क्रमांक MH 08 AP 5723) बसला ही धडक दिली. भरधाव ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने ट्रकचे नुकसान अधिक झाल्याचे दिसून येते.
या अपघातातील एसटी बस चालक रणजित मनोहर डुकरे (वय ४० रा. रत्नागिरी ) हे रत्नागिरी आगाराची बस तुळजापूरहुन रत्नागिरीच्या दिशेने आणत होते तर गॅस वाहतूक करणारा टेम्पो हा पालीच्या दिशेने जात होता. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाहीं. मात्र तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तातडीने अपघातस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, घन: श्याम जाधव, हवालदार जाधव, हवालदार वरवडकर आदी दाखल होऊन अपघतातील तिन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी पुढील कार्यवाही पोलीस करीत आहे.
