रत्नागिरी : अवघ्या आठवडाभरापूर्वीच शुभारंभ झालेल्या मुंबई सीएएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला भर पावसात देखील प्रवाशांकडून प्रतिसाद लाभत आहे. मागील नऊ दिवसांपैकी अप दिशेच्या एखाद दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वेच्या तिजोरीत भर घालणारी ठरली आहे.
कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या आरक्षण स्थितीनुसार वीकेंड एन्जॉय करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे उद्या शुक्रवारी (७ जुलै २०२३) पहाटे मुंबईतून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्ल धावणार आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (22229) च्या दि. ७ जुलैच्या फेरीला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंतच्या आरक्षण स्थितीनुसार या गाडीची चेअर कारची सर्वच्या सर्व तिकिटे संपली होती. एक्झिक्यूटिव्ह चेअर कारची केवळ सहा तिकिटेच रात्री अकरा वाजेपर्यंत शिल्लक होती. शुक्रवारी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी मडगावसाठी सुटणार असल्यामुळे आठ डब्यांच्या या गाडीची उरलेली सहा तिकिटेही सहज बुक होतील अशी स्थिती आहे.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!














