कलाशिक्षक रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करतील :
शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

जयगड येथे कलाकार्यशाळा ; जे एस डब्ल्यूचे सहकार्य

संगमेश्वर : कला जीवनातील नैराश्य दूर करते. यासाठी एखादी तरी कला आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. कलेमुळे माणसाच्या जीवनात आनंद निर्माण होतो. अभ्यासक्रमात कलाविषयाला महत्व देण्यात आले असल्याने कलाशिक्षक यासाठी विविध उपक्रमाद्वारे मेहनत घेत आहेत. संगमेश्वरच्या पैसा फंड प्रशालेतील कलादालन हा एक अभिनंदनीय प्रयोग आहे. देशाच्या संस्कृतीतही प्राचीन काळापासून कलेला महत्वाचे स्थान देण्यात आलेले असल्याने त्याचे प्रतिबिंब सर्वत्र उमटलेले दिसते. रत्नागिरी जिल्हा ही कलाकारांची भूमी आहे आणि कलाशिक्षक रत्नागिरी जिह्याचे नाव उज्वल करतील, असा विश्वास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे जिल्हा शाखा रत्नागिरी, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन जयगड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील कलाशिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा आणि कृती सत्राचे उद्घाटन आज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर जयगड येथे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर जे एस डब्ल्यूचे लॉजिस्टीक हेड समीर गायकवाड,अनिल दधिच, दीपा सावंत, तृप्ती वराठे, प्राथमिक विभागच्या कान्हे मॅडम , चित्रकार शीलकुमार कुंभार, शिल्पकार संदीप ताम्हनकर, इमतियाज शेख, राजन आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला आणि शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि जे एस डब्ल्यू फाऊंडेशन यांना या कार्यशाळा आणि कृतिसत्रासाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. उपस्थित मान्यवरांचा यावेळी एक वृक्ष, पुस्तक आणि श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. इमतियाज शेख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तयार केलेल्या जिल्ह्याच्या स्वतंत्र कला अभ्यासक्रम पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना जे एस डब्ल्यूचे समीर गायकवाड म्हणाले की, आपल्या शालेय जीवनात आपला कलेकडे ओढा नसल्याने मला चित्र काढता येत नसले तरी चित्राकडे पहाण्याची दृष्टी आपल्याकडे आहे. दिव्यांग असूनही हातात उत्तम कला असणाऱ्या मुलांची – कलाकारांची कला थक्क करणारी असते. अशा कलाकारांना आपण अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी कलाशिक्षकांसाठी अशा वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन धन्यवाद दिले.

जे एस डब्ल्यूचे अनिल दधिच यावेळी बोलतांना म्हणाले की , जे एस डब्ल्यू फाऊंडेशन कलाविषयासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कलाशिक्षकांचे उपक्रम अभिनंदनीय असल्याने आगामी काळात रत्नागिरी जिल्हा कलेचे माहेरघर म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयगड येथे जे एस डब्ल्यू फाऊंडेशनने कलाधाम उभारुन येथे कलाकारांच्या कलाकृतींची विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेने कला विषयाच्या प्रगतीसाठी जे उपक्रम हाती घेतले आहेत त्याचे दधिच यांनी कौतूक केले.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील ७० कलाशिक्षक उपस्थित असून यामध्ये विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उपक्रमशील कलाशिक्षकांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम पाटील यांनी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE