येत्या २ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार वितरण
देवरुख : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार” देवरूखचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांना ज़ाहीर झाला असल्याची माहिती मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचे समन्वयक एल. एस. दाते यांनी दिली.
३५ वर्षांपेक्षा अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असणारे सुरेश सप्रे यांची आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेबरोबरच सांस्कृतिक चळवळीतही सप्रे यांचा सहभाग आहे. सुरेश सप्रे यांचा पिंड पत्रकारितेचा! गेले सुमारे ३५ वर्ष ते पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य हि करत आहेत. पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे या समजाला छेद देत त्यानी तालुक्याच्या; जिल्ह्याच्या प्रत्येक चांगल्या कामात हिरहिरीने भाग घेतला. आपल्या ओळखीचा फायदा घेत अनेकांना मदत केली. अनेकजण त्यांचे बोट धरून पत्रकारितेत आले. अशातच त्यांना कर्करोगाने गाठले. परंतु मुळातच बंडखोर स्वभाव; अफाट जिद्द; प्रचंड इच्छाशक्ती तरीही फणसासारखा वरुन काटेरी आणि आतून रसाळ अशा गुणांवर त्यांनी कर्करोगाच्या राक्षसाला सुद्धा पराभूत केले.
हा पुरस्कार वितरण समारंभ २ आक्टोबरला मुंबई येथे संपन्न होणार आहे. “आदर्श पत्रकार” म्हणून “दर्पणरत्न पुरस्कार” मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
