नाणीज : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर साखरप्यानजीक करंजारी येथे ओव्हरटेकच्या नादात दोन ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रक चालक गाडीच्या केबिनमध्येच अडकून पडले होते. यातील एक चालक ठार झाला असून तिनजण जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास झाला. यावेळी दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने चालक सूर्यकांत जनार्दन चौधरी (36) आपल्या ताब्यातील ट्रक ( MH 12 KP 8943) घेऊन येत होता. तर दुसरा ट्रक रत्नागिरीतून कोल्हापूरच्या दिशेने ट्रक (MH 42 B 8961) चालक सुनील गंगाराम कोंडे ( 42 ) घेऊन जात होता. रत्नागिरीच्या दिशेने येणारा ट्रक चालक चौधरी हा करंजारीजवळ पुढच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कोंडे याच्या ट्रकला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, दोन्हीं ट्रकच्या केबिनचा चकाचूर झाला. दोन्ही चालक केबिनमध्येच अडकून पडले होते. यातील एक ट्रक लाकडाने भरलेला होता तर दुसरा ट्रक रिकामा रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या अपघातातील केबिनमध्ये अडकलेल्या दोन ट्रक चालकांपैकी एकाचा मृत्यू झाला.
या अपघातात ट्रक चालक सूर्यकांत जनार्दन चौधरीचा मृत्यू झाला. अन्य जखमी झालेले तीन जण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
