माईम, फोकडान्स, एकपात्री हिंदी, एकपात्री मराठी कला प्रकारात उमटवली मोहर
रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले. माईम, फोकडान्स, एकपात्री हिंदी, एकपात्री मराठी या कला प्रकारात आपली मोहर उमटवली.

सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते.

विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळते ते सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून. या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. ९ ऑगस्ट रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे – २०२३ करण्यात आले होते. दक्षिण रत्नागिरी झोनमधून सुमारे १६ महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यामध्ये एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने चमकदार कामगिरी केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. त्याशिवाय फोक डान्स कलाप्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. एकपात्रीमध्ये हिंदी व मराठी या दोन्ही विभागात अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. या यशामध्ये सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, प्रा. योगेश हळदवणेकर, प्रा. ताराचंद ढोबाळे, प्रा. प्रतीक्षा सुपल, प्रा. निशिता पिलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
