रत्नागिरी : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) अशी स्वतंत्र मेमू ट्रेन सोडण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे मुंबईहून चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मागील काही वर्षांपासून चिपळूणसाठी स्वतंत्र लोकल श्रेणीतील रेल्वे गाडी सोडण्यात येते. याही वर्षी दिनांक 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. दिवा ते चिपळूण मेमू गाडीची दिवा जंक्शन येथून सुटण्याची वेळ सायंकाळी 7:45 अशी होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी (01155) दिवा जंक्शन येथून दहा मिनिटे आधी म्हणजे सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे.

अप दिशेने धावणाऱ्या मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गणेशोत्सवात दिवा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत झालेल्या या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
