मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट
मुंबई : माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या व आमदार मुला विरोधात मुंबईतील नाराज पदाधिकाऱ्यांनी उघड उघड दंड थोपटल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठे नाराजीनाट्य सुरू असल्याचे दिसत आहे
मुंबईच्या कांदिवली, चारकोप व मालाड येथील ४०चेवर पदाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात आपला राजीनामा दिला असल्याची चर्चा असताना आता ३००चेवर पदाधिकारी व कार्यकर्ते माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधातही एकवटले असल्याचे चित्र दिसत आहे.
या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
याबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या गोरेगाव, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व,व दिंडोशी भागातील जवळपास ३००च्यावर पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहीती हाती आली. या भेटीत त्यांनी रामदास कदम यांच्याविरोधातील आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.
माजी मंत्री रामदास कदम पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शिवीगाळ करतात व पक्षातून काढून टाकण्याची धमकी देतात. त्यामुळे त्यांना हटवा किंवा आमचे राजीनामे घ्या, अशी टोकाची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिंदेंपुढे स्पष्ट पणे मांडल्याचे माहिती समोर आली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच अडचण झाली असल्याने त्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना संयमाचा सल्ला देत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. तसेच त्यांना राजीनामे न देणेची विनंती करत सबुरीचा सल्ला दिला असल्याची चर्चा सुरू आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदम पिता-पुत्रांबाबत काय भुमिका घेवून ठोस निर्णय घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
- Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
- Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
