Tivre Dam | तिवरे धरण बाधितांसाठी सिडकोच्या माध्यमातून ३३ घरे : ना. उदय सामंत


रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : सिडकोच्या माध्यमातून तिवरे धरण बाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या ३३ घरांसाठीची निविदा लवकरात लवकर काढून, घरांचे काम उत्तम दर्जाचे करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे तिवरे (भेंदवाडी) धरणग्रस्त कुटूंबियांच्या घरासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता डी. आर. हरताळकर, प्रांतधिकारी आकाश लिगाडे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीप मारसे आदींसह तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सिध्दीविनायक ट्रस्टच्यावतीने ५ कोटी रुपयातून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी ‍सिडकोने निधी मंजूर केला आहे. त्यासाठीचे अंदाजपत्रक सिडकोने बनवावे. यासाठीची निविदा लवकरात लवकर काढा. घरांचे काम उत्तम दर्जाचे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ३३ घरांपैकी १४ घरे धरणाकडे बांधण्यात येणार असून, त्यासाठी सीएसआर मधून जागा देण्यात आली आहे. बाकीचे घरे ही अलोरे येथे बांधण्यात येणार आहेत.
पालकमंत्री म्हणाले, पूर्वी जी २४ घरे बांधण्यात आली त्यासाठीची निविदा कमीमध्ये आल्याने रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम या घरांच्या नुतनीकरण, इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वापरावी, अशी सूचना त्यांनी संबधितांना दिली. यासाठी सिडकोमधील जादा रक्कमही वापरावी असे ते म्हणाले.


रुद्रच्या नावावर आलेले रक्कम १८ वर्षांनंतर त्यालाच मिळावी. यामध्ये कोणत्याही नातेवाईकांचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सक्षम प्राधिकारणाने ही रक्कम एफडी स्वरुपात ठेवावी आणि ती रक्कम १८ वर्षानंतर त्यालाच मिळेल, याची दक्षता घ्यावी.
यानंतर पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) संदर्भातील येथील कामकाजाचा आढावा घेतला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE