रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान घेण्यात आलेल्या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे पाच ते सहा गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. रेल्वेचा हा मेगा ब्लॉक पूर्व निर्धारित असला तरी विलंबाने धावू शकणाऱ्या संभाव्य गाड्यांशिवाय इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. या गाड्यांमध्ये जनशताब्दी एक्सप्रेससह तेजस एक्सप्रेसचाही समावेश होता.
कोकण रेल्वेच्या मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान मंगळवारी सकाळी साडेसात ते साडेदहा वाजता पूर्वनिर्धारित मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने हा पूर्वनिर्धारित मेगाब्लॉक घेतला होता. यामुळे तिरुनेलवेली ते जामनगर तसेच तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत विलंबाने धावणार असल्याचे रेल्वेने आधीच जाहीर केले होते.
मात्र प्रत्यक्षात या दोन गाड्यांव्यतिरिक्त इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका सहन करावा लागला. कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावरील गाड्यांच्या लाईव्ह स्टेटसनुसार कोईमतुर ते जबलपूर ही गाडी 21 मिनिटे, जामनगर एक्सप्रेस ही गाडी दोन तास 57 मिनिटे, मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस एक तास 34 मिनिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस एक तास, मुंबईतून मडगावच्या दिशेने येणारी जनशताब्दी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती.
संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे पुण्यातील काही गाड्या चिपळूण, सावर्डे, आरवली तर काही गाड्या रत्नागिरीला थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.














