- लायन्स क्लबचे दातृत्व कौतुकास्पद : तहसीलदार सौ. वराळे
गुहागर : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत तालुक्यातील ४५ गावातील १०९ विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी कौतुक केले. येथील श्री देव व्याडेश्वर मंदिराच्या परशुराम सभागृहात गुहागर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार प्रतिभा वराळे, चिपळूण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. तुषार गोखले, गुहागर लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे, डॉ. दिनेश जोशी, सेकेटरी ला. सचिन मुसळे, खजिनदार ला. मनिष खरे, ला. डॉ. मयुरेश बेंडल, माजी अध्यक्ष ला. शामकांत खातू, ला. नितीन बेंडल. ला. माधव ओक, ला. निखिल तांबट, ला. प्रसाद वैद्य, विजय सावंत, ला. रवींद्र खरे, ला. सुधाकर कांबळे, मनोज बोले, माजी नगरसेवक विकास मालप, बाबसाहेब राशिनकर आदी उपस्थित होते.

शासनातर्फे तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. परंतु, शासनातर्फे विद्यार्थ्यांना चष्मा मिळण्यास विलंब झाला. आणखी कालावधी गेल्यास घेतलेला नंबर बदलेल, या काळजीपोटी डोळ्यांचे डॉ. दिनेश जोशी यांनी गुहागर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. वरंडे यांच्याकडे याबाबत चर्चा केली. आम्ही लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांना चष्मे देऊ, असा शब्द श्री. वरंडे यांनी दिला. त्यानुसार या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे सदस्य ला. सुरेंद्र मर्दा व ला. मनीष खरे यांनी मोफत चष्मा देण्याचा खर्च उचलला.
यावेळी बोलताना तहसीलदार सौ. वराळे यांनी लायन्स क्लबने विद्यार्थ्यांसाठी केलेल्या दातृत्वाचे कौतुक केले आहे. शासन देईल तेव्हा देईल, पण आधी आपल्याला काय देता येईल, याचा विचार करून लायन्स क्लबने राबविलेला उपक्रम सर्वांसाठी नक्कीच आदर्शवत आहे, असे गौरोद्गार वराळे यांनी काढले. चिपळूण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. तुषार गोखले म्हणाले दोन वर्षापूर्वीच स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. माझेही हे आवडते क्लब आहे. तालुक्यातील सामाजिक कार्यात आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते आपण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गुहागर लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी या चांगल्या उपक्रमासाठी डॉ जोशी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थांना डॉक्टरांनी दिलेल्या तपासून दिलेले चष्यात वर्षभरात अडचणी आल्यास ते विनामूल्य बदलून देण्यास डॉ. जोशी यांना सांगितले. या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे सदस्य यांनी आर्थिक मदत केली त्यांचेही त्यांनी आभार मानले.














