चिपळूणचा परशुराम घाट महिनाभराने 24 तास वाहतुकीला खुला


रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर हा घाट 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर घाट दि. 26 पासून परशुराम घाटातून चोवीस तास 24 तास वाहतुकीसाठी खुला करणयात आला त्यामुळे कोकणसह जिल्हाभरातील एस.टी. वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून सुरळीत होणार आहे.
चिपळूणनजीकच्या परशुराम घाटातील धोकादायक भागातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून ठेकेदार कंपन्यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्‍यांनी परशुराम घाट दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल 700 मीटर लांबीच्या एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यश आले असून आगामी 15 जूनपर्यंत आणखी 300 मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.

परशुराम घाटातील वाहतूक दररोज सहा तास बंद ठेवली जात असल्याने एस.टी. महामंडळाने जिल्ह्यातील या महामार्गावरून जाणारी एसटी सेवा रद्द केली होती. त्यामुळे दुपारी 12 ते सायंकाळी 6 दरम्यान सुटणार्‍या गाड्या बंद होत्या. मात्र, आता एसटीचे वेळापत्रक नियमितपणे सुरू होणार असून मुंबई-गोवा महामार्गावरून सर्व आगारातून सुटणार्‍या गाड्या नियोजित वेळेत सुटणार आहेत. रातराणी बरोबरच दिवसाही महामार्गावरून मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणार्‍या गाड्यांची वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यामुळे आता लोकांना पर्यायी चिरणी मार्गे जावे लागणार नाही. या बरोबरच लोटे औद्योगिक वसाहतीमधील अधिकारी, कर्मचार्‍यांचा पर्यायी मार्गाचा हेलपाटा वाचणार असून त्यांना आता परशुराम घाट चोवीस तास खुला असणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE