लम्पीच्या साथीने रत्नागिरी जिल्ह्यात २८ जनावरांचा मृत्यू

मृत जनावरांच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि. ३ : जिल्ह्यात लम्पी आजारामुळे २८ जनावरे मृत झाली आहेत. मृत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये आणि वासरासाठी १६ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यंवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, २ लाख २६ हजार ५८३ जनावरांना लस देण्यात आली असून, उर्वरित ७ ते ८ हजार जनावरांना तात्काळ लस द्यावी. जनावरांच्या आजाराबाबत पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डाॕ. जगदाळे यांनी दिली.


पालकमंत्री श्री. सामंत यांनी शीळ धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचीही बैठक घेतली. प्रकल्पबाधितांना दाखले, गावठाण आणि शीळ धरणाची उंची या विषयांवर चर्चा करण्यात आली. २०० प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासाठी येत्या १५ दिवसात फणसवळे येथे कॅम्प लावून दाखले देण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच शीळ धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासंदर्भात, रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) आणि “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” योजनेबाबतची बैठक घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE