शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले
गुहागर : रात्रीच्यावेळी तालुक्यातील असोरे घाटीतील वळणावर चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली सून गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी रात्री असोरे येथे घडली. दोघा जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
अपघातातील गाडी नदीपात्रातून क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताची घटना कळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत मदतीसाठी धावून गेले होते.
चालक रोहित मोरे, मरीन सर्वेअर सुरज सूर्यवंशी हे दोघे जिंदल कंपनी येथून सायंकाळी निघाले होते. मध्येच जेवण करून ते असोरे मुंबईकडे निघाले. गुहागर तालुक्यातील असोरे घाटी येथे आले असता नदी पात्राच्या पुलाच्या खाली चालकाचा गाडी क्र. एमएच ०२ एफई १५८५ या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी बरा फूट खाली असलेल्या नदीपात्रात दगडावर जावून आदळली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. चाके, इंजिन दबले गेले आहे तर दोघानाही गंभीर दुखापत झाली. ही घटना असोरे येथील महेंद्र निमकर यांना कळताच त्यांनी तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना मोबाईलद्वारे सदरील घटना सांगितली. त्याचवेळी गुहागर मधील मराठा समाजाचे पदाधिकारी असलेले अमिष कदम व राजू सावरकर, विनोद मेस्त्री हे प्रवासादरम्यान त्याठिकाणी आले. त्याचवेळी तालुकाप्रमुख बाईतहि पुतण्या ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, विशाल नेटके, शैलेश दिंडे, पप्पू अचरेकर यांच्यासह पोहचले. येताना त्यांनी रुग्णवाहिका आणली होती. अपघातग्रस्तांना काळोखातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे प्राथमिक उपचारासाठी आणले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले.
दरम्यान, तालुकाप्रमुख बाईत यांनी बुधवारी स्वखर्चाने आबलोली येथील पटेल यांची क्रेन घेऊन असोरे येथे नदी पात्रात असलेली गाडी वर काढून ती आबलोली येथे सुरक्षित ठिकाणी आणून ठेवली आहे. यासाठी सचिन बाईत यांच्यासह दीपक पटेल, चेतन महाडिक, पटेल बंधू यांनी मेहनत घेतली.
