बांधकाम विभागाने अखेर लोवलेनजीकचा अपघाती खड्डा भरला

संगमेश्वर : संगमेश्वर- साखरपा राज्य मार्गाची या पावसाळ्यात पूर्णतः दुरवस्था झाली असून जागोजागी पडलेले मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत होते. लोवले नवनिर्माण महाविद्यालयाजवळील वळणार एका भल्या मोठ्या खड्यात आजवर दहा दुचाकीस्वार, दोन रिक्षा, एक टेंपो अपघातग्रस्त झाले होते.याबाबत वाहनचालकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख यांना हा अपघाती खड्डा तातडीने भरण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर आज बांधकाम विभाग देवरुखने धोकादायक वळणावरील हा खड्डा भरल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संगमेश्वर साखरपा राज्य मार्गावर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कमालीची वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी रुंद केलेला हा रस्ता आता वाढत्या वाहनसंख्येमुळे अरुंद भासू लागला आहे. अशा स्थितीत यावर्षीच्या पावसाळ्यात या मार्गाला जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्यावेळी दुचाकी आणि रिक्षांना सातत्याने अपघात होत होते. लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयानजीकच्या एका अवघड वळणावरचा एक खड्डा तर दहा फूट लांब आणि दीडफूट खोल होता. या वळणावर समोरुन वाहन आल्यानंतर संगमेश्वरकडे जाणारे वाहन या खड्ड्यात आपटून अपघातग्रस्त होत होते. याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसला आणि दहा दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाले होते.

लोवले येथील युवा कार्यकर्ते ओंकार चव्हाण यांनी बांधकाम विभाग देवरुख जवळ संपर्क साधून हे अपघाती खड्डे तातडीने भरण्याची मागणी केली होती. वाहनचालकांनी या मार्गावरील खड्ड्यांची व्यथा आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडताच त्यांनी तातडीने बांधकाम विभागाकडे संपर्क करुन प्रथम धोकादायक खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना उप अभियंता पूजा इंगवले यांना केल्या होत्या. त्यानुसार आज प्रथम अपघाती खड्डे बांधकाम विभागाकडून भरण्यात आले आहेत. खड्डे भरत असताना लोवले येथील युवा कार्यकर्ते ओंकार चव्हाण स्वत: उपस्थित होते.

संगमेश्वर देवरुख साखरपा या मार्गाची देखभाल दुरुस्ती काम पूर्ण झाल्यापासून पुढील पाच वर्षे संबंधित ठेकेदाराकडे असल्याने यामार्गाची उर्वरील देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या मार्गाच्या दुतर्फा साठलेली बारीक रेव दुचाकी अपघातास कारणीभूत ठरत असून पादचाऱ्यांना या रस्त्याच्या कडेने चालणेही अवघड झाले आहे. बांधकाम विभागाने ठेकेदार या मार्गाची देखभाल दुरुस्ती करेल त्यावेळी ही सर्व बारीक रेव बाजूला करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी ओंकार चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान वाहनचालकांनी आमदार शेखर निकम यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE