गरजूंना मोफत घरघंट्या, ग्रासकटर, शीतपेट्या वाटप
नाणीज : येथील जगद्गुरु नरेद्राचार्य महाराज सांप्रदायाच्या वतीने नाटे (ता. राजापूर) येथे पादुका दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरात पादुकांची मिरवणूक, संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत शेतकरी, महिला, मच्छिमारांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नाटे येथील नाटेश्वर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आज हा सोहळा झाला. रत्नागिरी जिल्हा स्व- स्वरूप संप्रदयातर्फे या सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक सकाळपासून आले होते.
सकाळी दहा वाजता नाटे येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका सजवलेल्या पालखीतून आणण्यात आल्या. त्यानंतर त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात कलशधारी महिला, ध्वजधारी स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये अग्रभागी ढोल-ताश्यांचे पथक सहभागी होते. अनेक धार्मिक, ऐतिहसिक, पौराणिक विषयावरील सजीव चित्ररथ हे या मिरवणुकीचे वेगळेपण होते. त्यात संतांची मांदियाळी, संत गोरा कुंभार देखावा, झाशीची राणी, संतशिरोमणी गजानन महाराज, बेटी बचाव, भजन, धनगरी गजा नृत्य असे अनेक विषयावरील देखावे होते. मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सोहळ्याच्या ठिकाणी मिरवणूक आल्यावर संतपीठावर पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली व सोहळा सुरू झाला.
यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमातून गोरगरीब शेतकरी, महिला व मच्छीमार महिलांना मोफत वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ९ गरीब गरजू महिलांना घरघंटी (पिठाची चक्की) चे वाटप करण्यात आले. मच्छिविक्री करणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी २५ शीत पेट्या देण्यात आल्या. शेतकरी बांधवांना चार ग्रासकटर देण्यात आले.
तसेच नाटे येथील नगर विद्यामंदिर शाळेला ५० हजार रुपये किंमतीचे प्रयोगशाळा साहित्य भेट देण्यात आले.
या सामाजिक उपक्रमातील वस्तूंचे वाटप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड ,
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव, नाटेचे सरपंच संदिप बांदकर, साखरी नाटेच्या सरपंच ठाकूर मॅडम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लांजेकर, प्रा. करे सर आदींच्या हस्ते झाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड म्हणाले, “जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे सर्व उपक्रम अनुकरणीय आहेत. त्यांनी लाखो लोकांना व्यसनमुक्त केले. त्यातून अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचवले आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव म्हणाले, ” समसजातील शेवटच्या घटकांचा विचार करून जगद्गुरूंनी सामाजिक उपक्रमांची रचना केली आहे.” कार्यक्रमाला राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन संस्थानच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला निरिक्षक संदिप नार्वेकर, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, पादुका दर्शन सोहळा प्रमुख नारायण गावकर, तालुका अध्यक्ष संतोष वाडकर सांप्रदायाचे सर्व पदाधिकारी, सर्व पीठ समिती सदस्य, पादुका दर्शन सोहळा प्रमुख उदय रानभरे महिलाध्यक्षा कोठावळे ताई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा सागवेकर यांनी केले.
या पादुका दर्शन कार्यक्रमात 626उपासकांनी दीक्षा देऊन घेतली.
प्रवचनकार आशा राऊत यांनी प्रवचन केले. त्यामध्ये त्यांनी सद्गुरूंचे महत्त्व काय आहे, ते विशद केले. आजच्या समाजाला अध्यात्माची गरज काय आहे? त्यात समाज बदलाची ताकद कशी आहे ते सांगितले.
संपूर्ण सोहळा अतिशय शिस्तबद्ध, अखिवरेखीव झाला. भाविक मोठ्यासंख्येने आले होते. सर्वांसाठी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची उतम सोय केली होती. भाविकांसाठी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. भव्य रांगोळ्या व फुलांनी मैदानावर सुंदर सजावट करण्यात आली होती.
