आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील प्रा. मयुरेश राणे आणि गौरी सागवेकर यांचा गौरव

देवरूख : देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल विभागाचे प्रा. मयुरेश प्रभाकर राणे आणि विद्यार्थिनी कुमारी गौरी महेंद्र सागवेकर (१२वी कला) यांनी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि एस. आर. दळवी फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम स्पर्धेत प्रा. मयुरेश राणे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल, तसेच कुमारी गौरी सागवेकर हिने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे यश प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांचे हस्ते गौरविण्यात आले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. सीमा शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. मयुरेश राणे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सीड बॉल, पर्यावरण पूरक धूपकांडी, कप व पेन यांची निर्मिती केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला हे यश प्राप्त झाले.

या उपक्रमाबाबत बोलताना प्रा. मयुरेश राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम पर्यावरणपूरक असून कमीत कमी खर्चामध्ये अतिशय उपयुक्त वस्तूची निर्मिती याद्वारे केली गेली आहे. सीडबॉलच्या साह्याने शेतीसाठी उपयोगात न येणाऱ्या जमिनीचा वापर करून अधिकाधिक वनांची निर्मिती करण्याचा यामागे उद्देश असल्याचे स्पष्ट केले. मच्छरनाशक अगरबत्ती, विविध वासांच्या अगरबत्ती व धुपकांडी यांच्यामुळे श्वसनाचे आजार होतात, यावर पर्यावरणपूरक धूपकांडी व कप उपयुक्त ठरतील. तसेच पर्यावरणपूरक पेनमधील रिफील संपल्यावर ते पेन माती किंवा कुंडीत ठेवल्यावर पाण्याने ती विरघळून जाऊन त्यामधील असलेल्या बियांपासून फुलझाडे, भाजीपाला यांची रोपे तयार होतील, अशी नाविन्यपूर्ण व उपयुक्त माहिती प्रा.राणे यांनी दिली.


महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, निसर्ग मंच विभाग आणि भूगोल विभाग यांच्यावतीने नियमितपणे पर्यावरणपूरक उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये जलसंधारण व जलसंवर्धन, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक वापरावर बंदी, नैसर्गिक शेती, वनसंवर्धन, आरोग्य व स्वच्छता यांच्या प्रसार व प्रचारासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. याचबरोबर सीड बॉलद्वारे वन निर्मिती, तसेच वैयक्तिक आरोग्यासाठी धूपकांडी, कप व पेन याबाबतचे महत्व महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजामध्ये पोहोचवत जनजागृती करत आहेत हि बाब कौतुकास्पद आहे असे प्राचार्य तेंडोलकर यांनी सांगितले
प्रा. मयुरेश राणे आणि विद्यार्थिनी गौरी सागवेकर यांचे संस्थाध्यक्ष. सर्व पदाधिकारी, पर्यवेक्षक व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE