इंडियन ऑईल विरोधात धूतूम ग्रामस्थ आक्रमक

  • भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या २५ वर्षात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता सतत परप्रांतियांना नोकरीत स्थान दिल्याने स्थानिक भूमिपुत्र अजूनही बेरोजगार राहिला आहे. पर्यायाने सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात २० नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा धूतुम ग्रामस्थांनी दिला आहे.

१९९७ साली धुतूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंडीयन ऑईल टँकिंग ही कंपनी सुरू झाली.या कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित झाल्या.या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.मात्र गेल्या २५ वर्षांत गावातील फक्त तिघांना कंपनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांत सामावून घेण्यात आले असून बहुतेक कामगार भरती परराज्यातून करण्यात आली.विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब गेल्या २५ वर्षात कोणीच विचारला नाही. मात्र सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सरपंच पदाचा कारभार सुरू करताच आय वो टी एल कंपनीच्या बेलगाम कारभारा विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांनी आपल्या बहुमूल्य जमिनी दिल्याने या कंपनीत त्यांना नोकऱ्या आजपावेतो का दिल्या नाहीत याचा जाब सरपंच सुचिता ठाकूर यांनी कंपनीत ग्रामस्थांसह जावून कंपनी प्रशासनाला विचारला.मात्र कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार धूतूम ग्रामस्थांनी केला आहे.

गावात अनेक मुले मुली उच्च शिक्षित असूनही त्यांना नोकर भरतीत सामावून न घेता कंपनी प्रशासन स्थानिक भूमी पुत्रांवर अन्याय करीत असल्याची भावना व्यक्त करून इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स कंपनीने आपली हुकूमशाही वृत्ती बदलली नाही तर कंपनीच्या प्रवेशद्वारात २० नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा धुतूम ग्रामपंचायत सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी दिला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE