मातृमंदिर गोकुळची ‘सलोख्याची दिवाळी’

मातृमंदिर म्हणजे केवळ उपक्रम नाही तर हा एक विचार

देवरुख दि. १८ ( प्रतिनिधी ): मातृमंदिरच्या गोकुळ बालगृहातील दिवाळी येथील मुलींसोबत मातृमंदिर परिवारासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा उपक्रम असतो. यावर्षी देखील गोकुळच्या मुलींना घरच्या मायेची ऊब मिळावी व त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी संचालक, कार्यकर्ते व मातृमंदिर मित्रपरिवार यांच्यातर्फे एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

हळबे मावशींनी मातृमंदिर संस्थेमध्ये कायमच सामाजिक साळोख्याच मूल्य जपलं. म्हणूनच जात -धर्म, गरीब -श्रीमंत आदी भेद बाजूला ठेवत यंदा मानवतेचा दीप लावून ‘सलोख्याची दिवाळी’ साजरी करण्यात आली.
महाराष्ट्रात व विशेषतः कोकणात आमच्या सण -उत्सवाच्या परंपरा या कायमच सलोख्याच्या राहिल्या आहेत. यामध्ये सत्ताकांक्षिणी अर्थकारणाने संकुचितपणा यायला सुरुवात झाली आहे. परंतु हा सामाजिक सलोखा जपणे हे आता सर्वांसमोर आव्हान आहे. पूर्वापार चालत आलेला हा आमच्या जातीय -धार्मिक समोख्याचा वारसा सण-उत्सवातील अनिष्ट प्रथा -परंपरा बाजूला करुन मूळ गाभा जपत आम्ही एकतेने चालू ठेवू हाच संदेश या निमित्ताने देण्यात आला.

गोकुळ बालगृहातील उपक्रम व मुलींच्या एकूण प्रगती व छंदाबाबत यावेळी अधीक्षक अश्विनी कांबळे यांनी विस्तृत आढावा दिला. या निमित्ताने अनेक अंगाने फुलत असलेले या मुलींच्या आयुष्याचा अंदाज यावेळी आला.याप्रसंगी गोकुळच्या आजी -माजी प्रवेशितांनी कविता व मनोगत व्यक्त केले.

सलोख्याची दिवाळी हा विचारच इतका महत्वाचा असल्याने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावस वाटलं असं मत तालुक्यातील प्रसिद्ध पशुवैद्यक डॉ. शेख यांनी मांडले. सध्याच्या स्थितीत एकत्र येऊन सण -उत्सव साजरे करण्याची आपली सलोख्याची परंपरा आपण जपली पाहिजे असे सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आयुब कापडी यांनी सांगितले. जेष्ठ कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी हा उपक्रमाच्या संकल्पनेला दाद देत असे उपक्रम अधिक ठिकाणी होण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे सांगितले. ॲड सरताज कापडी यांनी कोव्हीड पूर्वी केलेल्या अशा एकत्र दिवाळीच्या कार्यक्रमाच्या आठवणी शेयर केल्या. उपाध्यक्ष विलास कोळपे यांनी सलोख्याची दिवाळी बाबत बोलताना जेष्ठ शिक्षक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची कविता वाचून दाखवली. तसेच संदेश शेट्ये यांनी अशा प्रकारे आवश्यक उपक्रम करणाऱ्या सर्व टीमच्या सोबत आहे असा विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

अभिजित हेगशेट्ये यांनी गोकुळच्या मुलींनी केलेला सुंदर किल्ला व एकूणच दिवाळीच्या तयारीचे कौतुक केले. समाजातील सर्व स्तरातून आलेल्या मुलींना सामावून घेणारे गोकुळसारखी ठिकाणे ही सलोख्याची केंद्र आहेत. ही जपली पाहिजे असं सांगत मातृमंदिरच्या मूल्यांचा वारसा जपणाऱ्या गोकुळ विभागाचा अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या.

शेवटी डॉ. सुरेश जोशी यांनी मातृमंदिर हा एक विचार आहे, सलोख्याची परंपरा जपणाऱ्या या या मंदिराच्या वारीला आम्ही दरवर्षी आनंदाने येऊ असे सांगितले. मातृमंदिरमध्ये आल्यानंतर आपली निष्ठा आपोआपच घासून-तपासून निघते. यासाठी आवर्जून मातृमंदिरमध्ये यावं असं आवाहन यावेळी त्यांनी केले. मागील अनेक वर्ष कोकणातील सामाजिक प्रश्न, समृद्ध वारसा आणि जनजीवनाचा अचूक वेध घेणारा दिवाळी अंक ‘कोकण दिनांक ‘ चा दिवाळी २०२३ चा अंक या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.जेष्ठ पत्रकार अभिजित हेगशेट्ये यांनी संपादित केलेल्या या अंकात बारसु रिफायनरी व कातळ शिल्प याबाबत ची स्पष्टता देणारे विशेष लेख आहेत.

गोकुळच्या मुलींसह सलोख्याची दिवाळी साजरी करण्यासाठी ॲड. सरताज कापडी त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते. तसेच जेष्ठ कार्यकर्ते आयुब कापडी, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालक सीमा हेगशेट्ये, आरती पानवलकर, प्रसिद्ध चित्रकार विक्रम परांजपे, प्रशांत काबदुले व कुटुंबीय, चौगुले साहेब, पंडित मॅडम इत्यादी स्नेही तसेच मागील वर्षीपासून मुलींची दिवाळी आनंदाची होण्यासाठी योगदान देणारे शेखर नलावडे सहकार्यांसह उपस्थित होते. गोकुळच्या मुलींना अत्यंत आपुलकीने आणि घरची माया देणारा सर्व स्टाफ, मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या सुवर्णा जाधव , वैष्णवी खर्डे या शिक्षिका व पालक उपस्थित होते. शेवटी सर्वांनी गोकुळच्या मुलींसह दिवाळीचा फराळ करत सलोख्याची दिवाळी साजरी केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE