रत्नागिरी : शाश्वत मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जगभरातील लाखो लोकांसाठी अन्न सुरक्षा आणि उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी तसेच लहान मच्छीमारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन पाळला जातो. त्या निमित्ताने डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कृषि तंत्र विद्यालय, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्र विद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षीय विद्यार्थासाठी Sustainable fisheries (शास्वत मत्स्यव्यवसाय) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आनंद हणमंते, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र लांजा, उपस्थित होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी तसेच कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ.आशिष मोहिते सर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना मत्स्यव्यवसायाचे महत्व पटवून दिले.
सदर कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्याना भारताच्या आर्थिक व्यवस्थेत मत्स्य व्यवसायाचे महत्व, खेकडा संवर्धन: एक व्यवसाय, एकात्मिक मत्स्यशेती, रंगीत मासे – संधी आणि वाव तसेच कमी किमतीच्या आणि प्रतीच्या मासळीपासून मत्स्यपदार्थ तयार करणे इत्यादि विषयांवर डॉ. आशिष मोहिते, डॉ. ए.यु. पागरकर, डॉ. हरीष धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. संतोष मेतर, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे या सर्व विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री भूषण अनंत प्रभु याने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी अल्प प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नक्कीच या कार्य शाळेत मिळालेल्या मत्स्यव्यावसायिक ज्ञानाबद्दल आम्हाला नक्कीच फायदा होईल अशी खात्री वाटते असे विदित केले.
कार्यक्रम समन्वयक डॉ. हरीष धमगाये यांनी जागतिक मत्स्य व्यवसाय दिनाची यावर्षीची संकल्पना (लहान मच्छिमारांना सक्षम करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक वातावरण तयार करणे) विषद केली. उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर कार्यशाळेला कृषि विज्ञान केंद्राचे आणि कृषि तंत्र विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभव येवले, विषयतज्ञ (मत्स्य), आणि आभार प्रदर्शन श्री. शरद दिवटे यांनी केले.
या कार्यशाळेच्या आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्रिन्सिपल श्री. उमेश कुरतडकर यांनी त्यांच्या विद्यालयात सदर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए.यु. पागरकर (प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (सहयोगी प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. संतोष मेतर (अभिरक्षक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
