- स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांची घोषणा
रत्नागिरी : कोकणातील डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे आणि ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक, उक्षी गावचे सुपुत्र, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांना प्रतिष्ठेच्या ‘कोकण रत्न पदवी’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच याची अधिकृत घोषणा केली आहे. मुझम्मील काझी यांच्या आठ वर्षांच्या अथक आणि प्रभावी पत्रकारितेची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
गेली आठ वर्षे मुझम्मील काझी यांनी डिजिटल माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. त्यांनी कोकणातील ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न, स्थानिक स्तरावरील समस्या आणि प्रशासकीय कामकाजातील त्रुटी अत्यंत परखडपणे आणि निःपक्षपातीपणे समाजासमोर आणल्या. तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडल्यामुळे अनेक वेळा प्रशासनाला या प्रश्नांची गंभीर दखल घेणे भाग पडले आहे.
विविध युट्यूब चॅनेलमध्ये यशस्वीपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर मुझम्मील काझी यांनी स्वतःच्या ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाची सुरुवात केली. ‘ग्रामीण वार्ता’च्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक समस्यांचा पाठपुरावा करत गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याची महती आणि व्यापकता लक्षात घेऊनच ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’च्या वतीने त्यांना ‘कोकण रत्न पदवी’ प्रदान करण्यात येणार आहे.
या पदवी समारंभाचे आयोजन लवकरच करण्यात येणार असून, तो समारंभ संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.













