उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई ता. उरण जि. रायगड या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर विचारवंत,क्रांतीसुर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी म.ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य आपल्या मनोगतातून मांडले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस. यांनीही मनोगत व्यक्त केले. रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख आणि जुनियर कॉलेज विभाग प्रमुख शिंदे सर यांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली.
या कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत हे उपस्थित होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले. या कार्यक्रमासाठी यशवंत घरत, बाबुराव मढवी,शिक्षण प्रेमी नागरिक आणि सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घरत पी.जे. यांनी केले.
