रत्नागिरी, दि. २७ : भारत सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा बुधवारी रत्नागिरीमध्ये दाखल झाली. सकाळी लक्ष्मीचौक येथे झालेल्या यात्रेच्या कार्यक्रमात रहिवासी, लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला. श्री. मोदी यांनी देशभरातील विविध ठिकाणच्या शेतकरी, महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासन, नगरविकास विभाग व इतर विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली.

या योजना लोकांपर्यत पोहोचाव्या आणि योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु, आता पर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीसुद्धा या वेळी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार बाळ माने, राजेश सावंत, राजन फाळके, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, संपदा तळेकर, दादा ढेकणे, सौ. ढेकणे, विक्रम जैन आदींसह विविध सरकारी खात्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
