आध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी माणसाच्या विकासासाठी आवश्यक : अनंत गीते

संगमेश्वर दि. २९ : नवभारत छात्रालय हे छात्रालयात राहावं, त्याचं वसतिगृह होऊ नये. आजच्या स्थितीत छात्रालयाची गरज संपलेली नाही. नवभारत छात्रालय हे आदर्शवत आहे. या छात्रालयाचा मी माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. संत तुकाराम यांचे साहित्य वाचून मी मोठा झालो. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येकालाच तसं जगता येणार नाही, कारण ईश्वराने प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी माणसाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. विज्ञानाची बैठक अध्यात्मात आहे, त्यामुळे अध्यात्माला दुय्यम समजू नये , असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दापोली येथे बोलताना केले.

कुणबी सेवा संघ दापोली संचलित नवभारत छात्रालय दापोली येथे नुकताच सामंत आणि शिंदे गुरुजी या गुरुद्वयांचा स्मृती मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भारत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय चौधरी, डॉ. प्रमोद सावंत, ॲड. सुजित झिमण, डॉ. अशोक कुमार निर्बाण, सदाशिव चव्हाण, प्रभाकर शिंदे, हरिश्चंद्र गीते , हरिश्चंद्र कोकमकर , प्रभाकर तेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना प्रभाकर शिंदे म्हणाले की, सामंत आणि शिंदे गुरुजी यांच्या वैचारिक पायावर आजही संस्था तितक्यात जोमाने काम करत असून शिंदे गुरुजी यांनी घडविलेले अनेक माजी विद्यार्थी संस्थेला सहकार्य करून आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. यावेळी शिंदे यांनी संस्थेच्या विकास कामाचा आढावा घेतला. छात्रालयाच्या अमृत महोत्सवी स्मरणिकेसाठी देणगी देणाऱ्या सर्व सभासदांचे शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भरारी या वार्षिक अंकाचे, तसेच नवभारत छात्रालय अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सेवाव्रती पांडुरंग शिंदे स्मृती पुरस्कार प्राप्त दिनेश कानू चिपटे उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक ग्रामीण विभाग मळे ता. दापोली, राजेश रघुनाथ भागणे, करजी – कुणबी ता.खेड, दत्ताराम शिवराम पालकर – उत्कृष्ट शेतकरी कलानगर ता. दापोली, सचिन मनोहर पवार उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यकर्ता, मंडणगड. सौ. दर्शना संतोष वरवडेकर, दापोली यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ आणि पाच हजार रुपये रोख अशा स्वरूपात प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक राजेश भागणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप अभिमान वाटला. सामंत आणि शिंदे गुरुजी यांचे कार्य पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू असे आश्वासन भागणे यांनी यावेळी दिले. दर्शना वरवडेकर यांनी आपल्या मनोगतात, मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना समर्पित करत असल्याचे नमूद केले. कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या जागा न विकता त्यामधून विविध पिकांचे उत्पन्न काढल्यास नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळू शकेल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय चौधरी यांनी ” संत तुकाराम एक योद्धा संत ” या विषयावर बोलताना ते म्हणाले की , तुकोबा स्वतः शेतकरी होते. शेतकऱ्याला जेवढं काळाच भान असतं, तेवढ्या जगातील कोणत्याही माणसाला नसतं. चारशे वर्षांपूर्वी तुकोबांनी सांगितलेले वेळेचे महत्व आज आपल्याला कळलं आहे. देव दगडात न शोधता तो माणसात शोधला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने संत तुकारामांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . शिंदे गुरुजींनी त्यांच्या आयुष्यातील साठ वर्षे समाजासाठी काम केले आहे, हे काम पाहता ते खऱ्या अर्थाने तुकोबांचे वारस आहेत असे चौधरी यांनी नमूद केले.

हरिश्चंद्र गीते यांना सामंत आणि शिंदे गुरुजी यांचा सहवास लाभल्याने त्यांनी आपल्या मनोगतात या दोन्ही गुरुद्वायांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी गुरुद्वायांच्या स्मृतीस्थळी वंदन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रदीप इप्ते, शांताराम जाधव, पी.डी.ठोंबरे , भिकाजी कानसे, चंद्रकांत मोहिते, गीतांजली जोशी , सुषमा शिंदे , उज्वला इप्ते, गार्गी सावंत, पुष्पलता मालू , मंगल सणस, दीप्ती जलगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र कोकमकर, राजेंद्र शिंदे, रवींद्र गोरीवले, सुनील ठाकूर, वर्षा गोरीवले, कीर्ती घाग , रेणुका शिंदे, स्वाती विचले, समिधा कोकमकर, सुजित गोलांबडे , यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मळगे मॅडम यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE