रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

  • ढोल, ताशा, झांज, हलगी, घुमकं आणि तुतारीच्या निनादात फटाक्यांच्या आतषबाजीत शिवमय वातावरणात


रत्नागिरी दि. ४ : ढोल, ताशा, झांज, हलगी, घुमकं आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरण फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण आज झाले.


या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर, गायक स्वप्नील बांदोडकर, बिपीन बंदरकर, राहूल पंडित आदी उपस्थित होते.
रंगीत विजेच्या दिव्यांचा झोत आसमंतातील काळोखात पाझरत जात होता. छत्रपतींच्या पुतळ्यावर होणारी फटाक्यांची आतषबाजी हजारो उपस्थितांचे डोळे दीपवत होती. गायक स्वप्नील बांदोडकर आणि इशा पाटणकर यांच्या शिवमय गीतांने वातावरण भारुन गेले होते.


पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून वंदन करुन त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करुन राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला.


यानंतर प्रतिक्रीया देताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरीची भूमी आहे. हा पुतळा बसविताना मनस्वी आनंद होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यात रत्नागिरीला यश आलेले आहे.
दानशूर भागोजीशेठ कीर यांचा पुतळाही उभारण्याची घोषणा करुन पालकमंत्री म्हणाले, चार महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण होईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महनीय व्यक्तींचा अभ्यास करण्यास पुढच्या पिढीला यातून मदत होणार आहे.
अभिजित गोडबोले यांनी यावेळी सूत्रसंचलन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE