१२ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  • एमआयडीसीतर्फे पुढील ५ वर्षे १० लाख, त्यापुढील १० वर्षे १५ लाख संमेलनासाठी : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि. ५ : वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची 5 वर्षे 10 लाख रुपये तसेच 10 पुढील 10 वर्षे 15 लाख रुपये दिले जातील. तसा ठराव एमआयडीसीच्या बैठकीत केला जाईल, अशी घोषणा करतानाच पुढील वर्षी देखील रत्नागिरी येथेच संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी आग्रही भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.


येथील स्वयंवर मंगल कार्यालयात 12 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, निलेश महाराज, देवीदास महाराज, श्रीमंत शितोळे सरकार आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने आज रत्नागिरीची भूमी पावन झाली आहे. रत्नागिरीकर आज रिंगण आणि पंढरी अनुभवणार आहेत. जातीय भेद नष्ट करणे, संत साहित्याची परंपरा पुढे सुरु ठेवणे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकऱ्यांकडून होत आहे. वारकरी संप्रदायाला राजश्रय मिळाला पाहिजे. संप्रदायाच्या महंतांशी चर्चा करुन लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. तुमची भूमिका निश्चितच राज्याकडे मांडू. त्यात कुठेही मागे पडणार नाही, असेही ते म्हणाले.
संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर म्हणाले, वारकरी संप्रदयाचा विचार ज्यांने ज्यांने घेतला तो जगात नावारुपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे. हा संस्कार अशा संमेलनातून देऊन निरोगी समाजमन बनण्यास उपयुक्त ठरेल.


ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्ज्वलन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ह.भ.प. पांडूरंग महाराज राशीनकर यांच्या हस्ते ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांच्याकडे वीणा प्रदान करण्यात आली. प्रास्ताविकात ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी यांनी सविस्तर आढावा सांगितला. शेवटी ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने संमेलनाच्या उद्घाटन सत्राची समारोप करण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचलन पूर्वा पेठे यांनी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE