मुंबई : माथाडी कायद्याचे जनक कै.आमदार अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांनी माथाडी कायद्याचे अस्तित्व सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला बाबा आढावा आजही वयाच्या ९४ व्या वर्षी सातत्याने माथाडी कायद्याचे संरक्षण करण्यासाठी लढत आहेत पण विद्यमान सरकार हा कायदा मोडीत काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळी विधेयके आणून माथाडी कामगारांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा कुटील डाव करत आहे, पण हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही सरकारला वेळोवेळी पत्र व्यवहार करून कामगार मंत्री व कामगार खाते यांना त्याची जाणीव करून दिली आहे. आज आम्ही माथाडी कामगार बचाव कृती समितीच्या माध्यमातून आमरण साखळी उपोषण आयोजित केले आहे, जर का सरकारने या आमच्या उपोषण आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर अन्य मार्गाचा अवलंब करावाच लागेल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या आमरण साखळी उपोषणाच्या सभेत कामगार नेते बाबा आढाव बोलत होते.

या सभेला महाराष्ट्रातील विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेला बोलताना बाबा आढाव म्हणाले की, माथाडी कामगार कायद्याची मोडतोड करणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनिमयन) अधिनियम १९२३ मध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली लोकशाहीला संपुष्टात आणणारे सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ ही माथाडी कामगारांना उध्वस्त करणारी विधेयके सरकारने मागे घेतली नाहीत तर आमच्या माथाडी कामगार बचाव कृती समितीचा लढा आम्ही अधिक तीव्र करू आणि सरकारला जेरीस आणू असा इशाराही बाबा आढाव यांनी दिला.
या सभेत बोलताना माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, अण्णासाहेबांच्या माथाडी कायद्याचं अस्तित्व धोक्यात आणणारी विविध विधेयके संमत करून माथाडी कामगारांची रोजी रोटी हिसकाऊ पाहणाऱ्या सरकारला आम्ही कडवा विरोध करू, आज माथाडी कायद्याचा बचाव करण्यासाठी सर्व कामगार संघटनांचे आमरण साखळी उपोषण आम्ही पुकारलं, पण या सरकारने याची योग्य दखल न घेतल्यास यापुढे रस्ता रोको, गाड्या आडविणे, बाजारपेठा बंद ठेवून सरकारचा माथाडी कामगार कायद्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा कुटील डाव हाणून पाडू, पण यासाठी आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे.
यानंतर संघटनेचे कार्याध्यक्ष माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांनी आपल्या भाषणात माथाडी कामगारांच्या विविध समस्यांचा समस्यांचा आढावा घेऊन माथाडी कामगारांवर सरकारतर्फे कशाप्रकारे अन्याय होतोय हे स्पष्ट केले माथाडी कामगार नेते बळवंत पवार यांनी माथाडी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सरकारने आणली तर त्याचे माथाडी कामगारांवर व कायद्यावर कोणकोणते परिणाम होतील व माथाडी कामगार कामापासून वंचित होतील हे स्पष्ट केले. या सभेला कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, शिवाजी सुर्वे, निवृत्ती धुमाळ, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, दत्ता घंगाळे, सतीशराव जाधव आदी उपस्थित होते.
माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक मागे घेणे व माथाडी कामगारांच्या इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरीता माथाडी कायद बचाव कृती समितीच्यावतीने आझाद मैदान येथे सुरू असलेले आमरण व साखळी उपोषण आंदोलन दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील सुरू राहणार असल्याचा निर्णय कृती समितीच्यावतीने माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व बाबा आढाव यांच्यामार्फत घेण्यात आला आहे.
